coronavirus: मुंबईचा कोरोना मुक्ती दर ९२ टक्क्यांवर, चिंता होतेय हळूहळू कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:40 AM2020-12-10T03:40:32+5:302020-12-10T03:41:01+5:30

coronavirus In Mumbai : कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबईतील आकडेवारी अलीकडच्या काळात सातत्याने समाधानकारक म्हणावी, अशी राहिली आहे. एकीकडे कोविड रुग्णवाढीचा दर या आठवड्याला ०.२४ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

coronavirus: Mumbai's corona release rate at 92 percent | coronavirus: मुंबईचा कोरोना मुक्ती दर ९२ टक्क्यांवर, चिंता होतेय हळूहळू कमी

coronavirus: मुंबईचा कोरोना मुक्ती दर ९२ टक्क्यांवर, चिंता होतेय हळूहळू कमी

Next

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबईतील आकडेवारी अलीकडच्या काळात सातत्याने समाधानकारक म्हणावी, अशी राहिली आहे. एकीकडे कोविड रुग्णवाढीचा दर या आठवड्याला ०.२४ टक्क्यांवर स्थिरावला असून रुग्ण दुपटीचा कालावधीसुद्धा २९३ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनामुक्तीचे प्रमाण ९२ टक्के इतके झाले असून राज्याच्या दर ९३.४५ टक्के इतका झाला आहे.

एकेकाळी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येने मोठी चिंता निर्माण झाली होती. लोकसंख्येची जास्त असलेली घनता, दाट लोकवस्ती अशा विविध कारणांमुळे कोरोनावाढीचा दर मोठा होता. यावर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश आल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात रोजच्या रुग्णवाढीचा दरही आटोक्यात आला आहे. बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत आहे. 

आतापर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ६४ हजार २२८ इतकी आहे. तर, बुधवारी महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत ११ हजार ९०३ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आजवर कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ८७ हजार ८९८ इतकी आहे. तर, आतापर्यंत १० हजार ९२९ जणांना कोरोनामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले. 

डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने ९००च्या खाली राहिली आहे. तर, कोरोनामुक्तीची  संख्या २०५ तर १६५२ अशी बदलत राहिली. १ डिसेंबरला १२८० रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तर त्याच दिवशी ७२४ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. 

१ ते ९ डिसेंबर या कालावधीत ६ डिसेंबरला सर्वाधिक १६५२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद आहे. त्या खालोखाल ७ तारखेला १५९८ आणि १ तारखेला १२८० तर ४ डिसेंबरला १०२५ रूग्ण बरे होऊन घरी गेले. या कालावधीत ४ डिसेंबरला सर्वात कमी म्हणजेच ४०२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद आहे. 

मुंबईतील रुग्णसंख्या सातत्याने उतरणीला
सक्रिय रूग्णांच्या बाबतीत मुंबईतील रुग्णसंख्या सातत्याने उतरणीला लागल्याचे आकडेवारीवरून दिसते. मुंबईत सध्या १२ हजार १६८ रुग्ण आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाणे आणि पुण्यातील रुग्णसंख्या जास्त आहे. पुण्यात १५ हजार ६१६ तर ठाण्यात १३ हजार ९४८ सक्रिय रूग्ण आहेत.

Web Title: coronavirus: Mumbai's corona release rate at 92 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.