मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ३०० च्या वर पोहचली आहे तर २०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबईत बसला आहे. कारण एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजारांच्या वर पोहचला आहे. वरळी कोळीवाडा, धारावी अशा दाट वस्तीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशातच भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर विशेषत: शिवसेनेच्या ड्रीम प्रोजेक्टवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, राज्य सरकारला केंद्राकडून १० हजार कोटींची मदत हवी आहे. मात्र संकटकाळात मुंबईकरांचे जीव वाचवायला महापालिकेच्या ८० हजार कोटींच्या ठेवींना हात लावायला तयार नाहीत. या ८० हजार कोटींमधील २६ हजार कोटी पीएफ आणि कामगारांच्या पगारासाठी ठेवले असतील तर इतर ५४ हजार कोटी कोणासाठी ठेवलेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच हा पैसा कोविड युद्धात राज्य सरकारला दिला जाऊ शकतो. त्याचसोबत मुंबईतील कोस्टल रोडसाठीचा निधीही वळवता येईल कारण मुंबईकर जगले तर त्या रोडचा वापर करता येईल. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवापेक्षा कोस्टल रोड महत्त्वाचा नाही. असं केल्यास राज्य सरकारला केंद्राच्या निधीची गरज भासणार नाही तसेच अर्थव्यवस्था सुधारण्यासही मदत होईल. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे मुंबईकरांचा जीव महत्त्वाचा की कोस्टल रोड हे उत्तर त्यांनी द्यावं असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, जेव्हा महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आली त्यावेळी बुलेट ट्रेनला विरोध करत हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरणार असल्याचं सांगितले होतं. मग आता कोस्टल रोडपेक्षा मुंबईकरांचा जीव मोठा आहे. मी जे बोलतोय ते खरं नसेल तर बीएमसी असो राज्य सरकारमधील कोणीही माझ्यासमोर यावं. का ते ८० हजार कोटींना हात लावत नाहीत? मी कोणत्याही व्यासपीठावर येऊन खुली चर्चा करण्यास तयार आहे असं आवाहन भाजपा आमदार नितेश राणेंनी राज्य सरकारला दिलं आहे.