Join us

Coronavirus: मुंबईचा मृत्यूदर तीन टक्के; २१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 7:21 AM

मुंबईत १०,७१४ कोरोना रुग्ण झाले असून आतापर्यंत ४२१ बळी गेले आहेत. शहर उपनगरात बुधवारी २५ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील १९ जणांना दीर्घकालीन आजार होते.

मुंबई : आतापर्यंत मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेले रुग्ण २१ टक्के असून शहर उपनगराचा मृत्यूदर तीन टक्के असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सहा सरकारी प्रयोगशाळा, ११ खासगी प्रयोगशाळा मिळून एक लाख चाचण्यांचा टप्पा पालिका प्रशासनाने ओलांडला आहे.

या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह आढळण्याचा दर १० टक्के आहे. मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका व राज्य शासन कंबर कसत असून याकरिता खासगी, शासकीय व पालिका रुग्णालयांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करण्यात आले आहे. मार्च २०२० पासून मुंबई महानगरपालिकेने खासगी प्रयोगशाळांना कोरोना युद्धात सामिल करुन घेतले आणि त्यामुळे चाचण्यांची क्षमता वाढली. मुंबईतवाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता उपचार व विलगीकरण सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी पालिकेने येत्या १५ दिवसांत आणखीकोरोना केअर सेंटर उभारण्याचे नियोजन केले आहे. महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरु विज्ञान केंद्र, वांद्रे कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए मैदान,माहिम निसर्ग उद्यान, गोरेगाव येतील नेस्को मैदान आदी ठिकाणी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.

तीव्र स्वरुपांच्या बाधितांसाठी सध्या असलेली ३ हजार खाटांची क्षमता वाढवून ती ४,७५० इतकी होणार आहे. त्यासाठी नायर, केईएम,सेव्हन हिल्स या रुग्णालयांचा समावेश आहे. तर लवकरच मोबाइल अतिदक्षता खाटा देखील नॅशनल स्पोर्टस सेंटर आॅफ इंडिया डोम(एनएससीआय) येथे तयार करण्यात येणार आहे.मुंबईत १०,७१४ कोरोना रुग्ण झाले असून आतापर्यंत ४२१ बळी गेले आहेत. शहर उपनगरात बुधवारी २५ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील १९ जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील १५ पुरुष तर १० महिला होत्या. दिवसभरात १५९ जण तर आतापर्यंत मुंबईतील २,२८७ जण कोरोनामुक्त झाले. तर राज्यात दिवसभरात नोंद झालेल्या ३४ मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. ३४ पैकी २७ रुग्णांमध्ये अतिजोखमीचे आजार आढळले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या