- जमीर काझी मुंबई : रमजान महिन्यातील भेंडीबाजारमधील खाद्यपदार्थांचे मार्केट हा सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरतो. यंदा मात्र अडीच शतकांनंतर हा बाजार बंद राहणार आहे. मुस्लीम बांधवांचे रोजे (उपवास) अवघ्या ३ दिवसांवर असतानाच एरवी उत्साहाने ओसंडून वाहणारे वातावरण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे सुनेसुने झाले आहे.दक्षिण मुंबईतील महंमद अली रोड, मिनारा मस्जिद, भेंडीबाजार, पायधुनी या परिसरात अडीचशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. रमजान महिन्यात रोज संध्याकाळपासून (सहेरी) पहाटेपर्यंत खाद्यपदार्थांचा बाजार खवय्यांनी फुललेला असतो. प्रामुख्याने मुस्लीम बहुलवस्ती आणि व्यापारी, दुकानाचा भरणा असलेला हा भाग ब्रिटिश काळापासून रमजान महिन्यात विविध स्वादांच्या अनोख्या खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहे. काळानुरूप त्यात बदल होत चवीची ही परंपरा अधिक रुचकर होत गेली. त्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हे तर बहुसंख्य हिंदू बांधव, भगिनीही या परिसरात गर्दी करून खवय्येगिरीची हौस भागवतात. त्यामुळेच १९९३ चे बॉम्बस्फोट, दंगली, मुंबईवरील हल्ल्याच्या वर्षीसुद्धा येथील गर्दी कधीच ओसरली नव्हती. यावर्षी मात्र लॉकडाउनमुळे यंदा रमजानमधील भेंडीबाजारच्या वर्दळीला आहोटी लागणार हे निश्चित आहे.या ठिकाणी वाढणाऱ्या गर्दीला रोखणे अशक्य असल्याने कालांतराने वांद्रे, माहीम, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी, मीरा रोड, वसई आदी ठिकाणी रमजानचे खाद्यपदार्थ बाजार विकसित होत गेले. पण तरीही भेंडीबाजाराचे महत्त्व कायम आहे. हे लक्षात घेता या काळात संध्याकाळी किमान दोन तास तरी दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिसांकडे केल्याचे माशाल्लाह पाककृती रेस्टॉरंटचे मालक अब्दुल रहेमान यांनी सांगितले. मात्र सद्यस्थितीत ती मंजूर होणे अशक्य असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवले.कोट्यवधींच्या उलाढालीवर फिरणार पाणीमिनारा मशिदीच्या सभोवताली चालणाºया ऐतिहासिक खाऊगल्लीत देशभरातील तब्बल ४०० हून अधिक प्रकारचे प्रसिद्ध शाकाहारी व मांसाहारी पदार्थ आणि १०० हून अधिक प्रकारची शीतपेय बनविली जातात. त्याचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईसह देशभरातील नागरिक रमजानमध्ये गर्दी करतात. एका रात्रीत येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील २५० हून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच ईदच्या दिवशी बनविल्या जाणाºया शीरकुर्म्यासाठीच्या साहित्याचे, तयार कपड्यांचे स्टॉल रात्रभर लावलेले असतात. या ठिकाणी रोज सरासरी १२ ते १४ हजारांहून अधिक नागरिक येतात. महिनाअखेर त्याचे प्रमाण आणखी वाढते. येथे एका रात्रीत होणाºया विक्रीतून एकूण २ ते ३ कोटींची उलाढाल होत असल्याचा अंदाज आर्थिक अभ्यासक व उर्दूतील ज्येष्ठ पत्रकार इजहार अहमद अन्सारी यांनी व्यक्त केला. मात्र, कोरोनामुळे उत्साह आणि आर्थिक उलाढाल दोन्हीवर पाणी फिरेल, असेच काहीसे चित्र आहे.
CoronaVirus: अडीच शतकांनंतर यंदा भेंडीबाजारात रमजानच्या रात्री सुन्यासुन्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 5:57 AM