मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल थेट महापालिकेला देण्याचे खाजगी प्रयोगशाळांना दिलेले आदेश अखेर प्रशासनाने रद्द केले आहेत. यापुढे पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल महापालिकेला मिळाल्यानंतर ते संबंधित रुग्णांच्या हातात पडणार आहेत. तसे सुधारित परिपत्रक महापालिकेने काढले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल मिळाल्यानंतर लक्षणे नसलेले रुग्णही रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे रुग्णालयात घेण्याची गरज असलेल्या बाधित रुग्णांना खाटा मिळण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. हा गोंधळ टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने खासगी प्रयोगशाळांना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल थेट पालिकेकडे पाठविण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले होते. मात्र महापालिकेच्या या निर्णयाला तीव्र विरोध होऊ लागला व हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले.
याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांचे चाचणी अहवाल देण्यात यावेत, असे सुधारित परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे. मात्र रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आधी पालिकेला मिळणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित रुग्णांना दिला जाणार आहे. तसेच पालिकेने प्रत्येक विभाग कार्यालयात सुरू केलेल्या वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार त्यांना रुग्णालयात, कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.हाय रिस्क गटाची माहिती द्यावीबाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील नातेवाईक अथवा कुटुंबातील व्यक्ती हाय रिस्क गटात गणल्या जातात. अशा गटातील व्यक्तींची चाचणी प्रयोग शाळेमार्फत केल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित विभाग कार्यालयाच्या वॉर रूमला कळविणे बंधनकारक असेल, असे पालिकेने आपल्या परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.