मुंबई : वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वर नगर, पत्थरनगर या परिसरत आतापर्यंत १८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ही वस्ती दाटीवाटीने वसलेली असल्यामुळे येथील बाधित क्षेत्रांमध्ये निर्बंध राबविणे महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी पालिका आणि पोलिसांनी एकत्रित येऊन या दाटीवाटीच्या वस्त्यांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच घरात राहूनच रमजान साजरा करावा असे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
वरळी, धारावी प्रमाणेच एच-पूर्व विभागात दाटीवाटीने वसलेल्या झोपड्यांची संख्या मोठी आहे. परिणामी, येथे कोरोनाचा संसर्ग येथील रहिवाशांमध्ये झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या महिन्याभरात या परिसरातील तब्बल १८४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या विभागातील बाधित क्षेत्रांमध्ये गर्दी टाळण्यासाठी पालिकेमार्फत खबरदारी घेतली जात आहे. मात्र दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची संख्या खूप जास्त असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळेच पालिकेने या भागात पोलिसांच्या मदतीने ‘ड्रोन' कॅमेर्याच्या सहाय्याने येथील नागरिकांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. शनिवारपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. या काळात उपवासादरम्यान नागरिकांनी घरात राहूनच कोरोना संकटाशी मुकाबला करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृतीही केली जात आहे.
- लोकांचे प्रबोधन करण्यासाठी या परिसरात पालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून वस्त्यांमधून लाऊडस्पीकरवरून वेळोवेळी उद्घोषणा करून नागरिकांना सावध, सतर्क केले जात आहे.- सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना काळजी घेणे, याबाबत जनजागृती करण्यासाठी एच पूर्व विभागातील अधिकारी, खेरवाडी पोलीस स्टेशन व बीकेसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ‘ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया' चे प्रतिनिधी यांच्या सहभागाने कार्यवाही करण्यात येत आहे. - यामध्ये नियम मोडणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.