शेफाली परब-पंडित मुंबई : यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असला तरी मुंबईतील काही बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असल्याने सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी विभागस्तरावर नियोजन केले जात आहे.
बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसल्यास फेरीवाल्यांना अन्यत्र हलवणे, एका बाजूची दुकाने बंद ठेवणे अशी खबरदारी घेतली जात आहे. उत्सवाच्या काळातील उत्साह कोरोनाला पोषक ठरू नये, यासाठी पालिका अधिकारी डोळ्यांत तेल घालून सतर्क आहेत.कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ८८ दिवसांवर पोहोचला आहे. तर दैनंदिन रुग्णवाढही ०.७९ टक्के एवढी कमी आहे. मात्र लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असल्याने मुंबईकर आता घराबाहेर पडू लागले आहेत.
यामुळे कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भाविकांनीही चांगले सहकार्य केल्यामुळे आतापर्यंत गणेशोत्सव निर्विघ्न पार पडत आहे. तरीही सार्वजनिक परिसरात गर्दी दिसून येत असल्याने पालिका प्रशासनाने २४ प्रशासकीय विभागाच्या सहायक आयुक्तांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागात सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी पालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत.
सहायक आयुक्तांनाही आपल्या विभागात नियमित फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बजावण्यात आले आहे. मुख्यत: बाजारपेठ, दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असते. एखाद्या ठिकाणी अशी गर्दी दिसून आल्यास पालिका अधिकाऱ्यांनी तत्काळ तेथील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, एका बाजूची दुकाने बंद करावी, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दर्शन बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी होत नाही, तसेच मंडळातही दहापेक्षा अधिक कार्यकर्ते नसतात. चौपाटीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावले आहेत. अर्ध्या अर्ध्या तासांचा टाइम स्लॉट ठेवण्यात आला आहे, जेणेकरून त्या वेळेतच नियोजित मंडळ आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करतील. कृत्रिम तलाव आणि फिरत्या वाहनातील तलावालाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. - प्रशांत गायकवाड (सहायक आयुक्त, डी विभाग (गिरगाव, ग्रँट रोड)कुर्ला, साकीनाका, चांदिवली या विभागात सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी उपद्रव शोध पथक तैनात ठेवले आहेत. मास्क न लावणाºया लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गर्दी होणाºया ठिकाणी पोलिसांच्या मदतीने समज देणे अथवा कारवाई केली जात आहे. - मनीष वाळुंज (सहायक आयुक्त, एल विभाग)कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास तत्काळ उपाययोजना करण्यासाठी महापालिका सज्ज आहे. याकरिता जम्बो फॅसिलिटी सेंटर, कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशी यंत्रणा तैनात आहे. - सुरेश काकाणी, (अतिरिक्त महापालिका आयुक्त)