Join us

coronavirus: खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची धावपळ, संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 2:57 AM

प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात. मात्र यावर्षी मुंबईत सुरू असलेल्या कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा गेल्या चार महिन्यांपासून व्यस्त असल्याने पावसाळापूर्व कामे रखडली.

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईत हजेरी लावण्यास सुरुवात करताच रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डे दिसू लागले आहेत. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाचा प्रसार रोखण्यात व्यस्त असल्याने पावसाळ्यापूर्वी अपेक्षित असलेली डागडुजी करण्याचा अवधी रस्ते विभागाला मिळाला नाही. त्यामुळे आता खड्डे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. यासाठी खड्ड्यांबाबत तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात. मात्र यावर्षी मुंबईत सुरू असलेल्या कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा गेल्या चार महिन्यांपासून व्यस्त असल्याने पावसाळापूर्व कामे रखडली.याचा फटका रस्तेदुरुस्ती विभागालाही बसला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मुंबईवर खड्ड्यांचे संकट असल्याचे ‘लोकमत’मध्ये ‘कोरोनामुळे मुंबईवर आले खड्ड्यांचे संकट’ या वृत्ताद्वारे गुरुवारी निदर्शनास आणले. त्यानंतर पालिका प्रशासनाने खड्ड्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.तक्रारींसाठी अन्य पर्यायअ‍ॅपबरोबरच portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळावरही खड्ड्यांबाबत तक्रार करता येऊ शकते. त्याचबरोबर www.mybmcpotholefixit.com एक स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरही जीपीएस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नकाशा आधारित तक्रार करता येऊ शकते. विशेष म्हणजे सिम्बीयन, अ‍ॅण्ड्रॉईड, आयओएस अशा तीनही प्रकारच्या आॅपरेटिंग सिस्टीम असणाºया मोबाइलवर हे संकेतस्थळ ‘ओपन’ होऊ शकते. तसेच ‘१९-१६’  ही हेल्पलाइन अथवा १८००-२२-१२-९३ या टोल फ्री क्रमांकावरही खड्डेविषयक तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत.खड्ड्यांच्या फोटोसह करा तक्रारएखाद्या रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्याबाबत पालिकेला कळविण्यासाठी  MyBMC Pothole FixItl विशेष मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आला आहे.गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही खड्ड्यांच्या तक्रारी या अ‍ॅपद्वारे घेण्यात येत आहेत. त्यानुसार मोबाइलमधील जीपीएस / लोकेशन आॅन करून रस्त्यावरील खड्ड्यांचा फोटो काढल्यास व तो फोटो तिथूनच अ‍ॅपमध्ये अपलोड केल्यास संबंधित ठिकाणाच्या नकाशासह अपलोड होतो.यामुळे रस्त्यावर कोणत्या ठिकाणी खड्डा आहे? याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होते. तसेच तक्रारदाराला विशिष्ट तक्रार क्रमांक प्राप्त होतो.त्यामुळे तो खड्डा किती वेळेत भरला गेला याबाबत सर्व माहिती तक्रारदाराला उपलब्ध होते.४८ तासांत खड्डे भरणारखड्ड्यांबाबत तक्रार आल्यानंतर ४८ तासांच्या आत तो खड्डा भरणे पालिकेचे अभियंता-ठेकेदारांना बंधनकारक आहे. खड्डा भरून संबंधित रस्ता सुस्थितीत केल्यानंतर त्या ठिकाणचा सुधारित फोटो अ‍ॅपवर अपडेट केला जातो. मात्र खड्डा भरण्यासाठी ४८ तासांहून अधिक कालावधी लागल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.

टॅग्स :मुंबईखड्डे