coronavirus: महापालिका वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक सक्तीला विरोध, सोमवारी ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 03:12 AM2020-07-11T03:12:16+5:302020-07-11T03:13:02+5:30
वैद्यकीय कर्मचा-यांनाही बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्यात यावे, यासाठी पालिका संघटनांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना ६ जुलैपासून सक्तीची करण्यात आलेल्या बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय कामगार संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने मागे घेतला. मात्र वैद्यकीय कर्मचा-यांना हा नियम अद्याप लागू आहे. कोविड योद्धा म्हणून गेले चार महिने कोरोनाशी झुंज देणा-या या कर्मचा-यांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे वैद्यकीय कर्मचा-यांनाही बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्यात यावे, यासाठी पालिका संघटनांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
पालिकेतील सुमारे एक लाख कर्मचा-यांना ६ जुलैपासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिक हजेरीमुळे संसर्ग वाढू शकतो, असा युक्तिवाद संघटनांनी मांडला. त्यानंतर पालिका प्रशासनाने वैद्यकीय कर्मचाºयांना वगळता अन्य सर्व कर्मचाºयांसाठी मस्टरवर हजेरी लावण्यास परवानगी दिली.
मात्र प्रशासनाच्या या निर्णयाचा पालिका रुग्णालयात काम करणाºया कर्मचाºयांनी निषेध केला आहे.
रुग्णालयांतील कर्मचाºयांना कोरोनाचा धोका अधिक असल्यामुळे पालिका प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे घ्यावा, तसेच संबंधित परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी सर्व संघटनांकडून जोर धरत आहे. वैद्यकीय कर्मचाºयांना पालिकेच्या इतर कर्मचाºयांप्रमाणे मस्टरवर हजेरी लावण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन होणार आहे. या आंदोलनात पालिकेतील म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेना, म्युनिसिपल मजदूर युनियनसह सर्व कामगार-कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.