मुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण सेवक यांना येत्या दोन दिवसांत शाळांत उपस्थित राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार विभागीय अधिकाऱ्यांनी सर्व माध्यमाच्या महानगरपालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र दिले असून शाळांमध्ये १०० टक्के उपस्थितीसाठी सूचना दिल्या आहेत.शाळेत उपस्थित न झाल्यास महानगरपालिका नियमावलीनुसार शाळांवर, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असून त्यासाठी ते स्वत:च जबाबदार असणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनक आहे. अशातच अनेक शिक्षक आपापल्या गावी गेले आहेत, तर अनेक शिक्षक रेड झोनमध्ये येत असल्याने त्यांचे प्रवास करणे दूरच, पण बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत नवीन महानगरपालिका आयुक्तांचा निर्णय शिक्षकांना बुचकळ्यात पाडणारा आहे. गावी गेलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनाही दोन दिवसांत शाळेत उपस्थित राहून उपस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत़ अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर, कर्जत, टिटवाळा, शहापूर, तर पालघर जिल्ह्यात व नवी मुंबईत मोठ्या संख्येने राहतात. अनेक शिक्षक मूळ गावी गेल्याने ते दोन दिवसात कसे उपस्थित राहतील याचा मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने विचार करावा व कारवाई करण्याचे पत्र मागे घ्यावे अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली़
coronavirus: पालिकेच्या शिक्षकांनो दोन दिवसांत हजर व्हा; अन्यथा कारवाई, आयुक्तांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 3:37 AM