मुंबई - कोरोनाचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र युरोप, अमेरिका, रशिया अशा काही देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. अशावेळी परदेशी पाहुणे कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी मुंबईत आल्यास कोविडचा फैलाव होण्याचा धोका आहे. त्या देशांमध्ये कोविडच्या कोणत्या प्रकारचा प्रसार सुरु आहे? याची माहिती मिळाल्यास भविष्यत त्याचा सामान करणे शक्य होईल. त्यामुळे अशा देशांमधील कोविड विषाणूचा जिनोम सिक्वेंसिंगचा (जनुकीय सूत्र) अहवाल मागविण्याची विनंती पालिका प्रशासनाने राज्याच्या कोविड टास्क फोर्सकडे केली आहे.
मार्च २०२० मध्ये कोविडची पहिली लाट मुंबईत आली. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसरी लाट येऊन धडकली. या लाटेचा प्रसार मागील दोन महिन्यात आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. कोरोना वाढीचा दैनंदिन सरासरी रुग्णवाढ ०.०३ टक्के एवढी आहे. कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करण्यात आला आहे. तर जानेवारी अखेरीपर्यंत संपूर्ण मुंबईकरांचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण होणार आहेत. लसीकरणाचा चांगलाच प्रभाव दिसून येत असल्याने मुंबईतील सर्व निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने महापालिका पुन्हा सतर्क झाली आहे.
दरम्यान, इतर देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव सुरु झाला आहे. पुढच्या महिन्यात नाताळची सुट्टी व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत परदेशी नागरिक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. मुंबईत परदेशी नागरिकांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची कोविड चाचणी केली जाणार आहे. तरीही एखाद्यावेळेस अन्य देशातील कोविडचा फैलाव मुंबईत झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रणा तैनात असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोविडचा फैलाव होणाऱ्या देशांमध्ये कोणता व्हेरियंट (कोविडचा प्रकार) आहे. त्याचा फैलाव कसा रोखता येईल? येथील औषधोपचार, लसीकरण त्यावर प्रभाव ठरेल का? याची माहिती पालिका प्रशासन एकत्रित करीत आहेत.
- देशात वेगाने होणार्या कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी काही दिवस देशांतर्गत प्रवास बंद करण्यात आला होता. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा काही अटी-शर्तीवर भारताने ९६ देशांशी करार करुन विमान प्रवास सुरू करण्यात आला.
- कोरोनाचा प्रसार वाढलेल्या देशातून येणार्या नागरिकांनी दोन डोस घेतले नसल्यास आरटीपीआर चाचणी आणि सात दिवस होम क्वारेंटाइन करण्यात येत आहे.
- मुंबईत राज्यांतर्गत आणि देशांतर्गत असे एकूण ३० हजार प्रवासी येत आहेत. आतापर्यंत विमानतळावर चार लाख २० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.