Coronavirus: ‘त्या’ रुग्णांपर्यंत पोहोचण्यात महापालिकेला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 01:46 AM2020-03-30T01:46:58+5:302020-03-30T06:18:46+5:30
आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ७३ रुग्णांपैकी २५ रुग्णांना पालिकेच्या आरोग्य पथकाने शोधले आहे.
मुंबई : कोरोनाची लागण होण्याचा धोका असलेल्या ३५ टक्के रुग्णांना वेळेची शोधून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात महापालिकेला गेल्या काही दिवसांमध्ये यश आले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या जवळच्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचा यात समावेश आहे.
आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ७३ रुग्णांपैकी २५ रुग्णांना पालिकेच्या आरोग्य पथकाने शोधले आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ८१९ रुग्णांना ह्य होम क्वॉरंटाईन ह्य चा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून यापैकी कोणी बाधित असल्यास त्यांच्या संपर्कात येऊन आणखी रुग्ण वाढण्याचा धोका टाळता येईल, असा विश्वास आरोग्य खात्याकडून व्यक्त होत आहे.
असा शोधण्यात येतो रुग्ण..
पालिकेने केलेल्या चाचणीत एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास आरोग्य पथक त्या रुग्णाच्या घरचा पत्ता घेऊन रोगाची लागण होण्याचा सर्वाधिक व कमी धोका असलेल्या त्याच्या जवळच्या व संपकार्तील नातेवाईकांचा शोध घेतात. त्यांच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत का? याची तपासणी केली जाते. तसेच त्यांना १४ दिवसांच्या होम क्वॉरंटाईन चा सल्ला देण्यात येतो.
असे सुरू आहे कोरोनाशी लढा...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना बाधित रुग्णाच्या तीन किलोमीटर अंतरावरील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यानंतर अधिकारी तपासणी करत आहेत.
संभाव्य रुग्णांची वर्गवारी...
यामध्ये ए, बी आणि सी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ए मध्ये रुग्णाचे कुटुंबीय ज्यांना लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे. बी मध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि सी मध्ये ज्यांना कमी धोका आहे, अशी नोंद केली जाते. यापैकी सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींची तात्काळ आरोग्य चाचणी केली जाते. तर कमी धोका असलेल्या व्यक्तींना १४ दिवसांच्या होम क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात येतो. डॉक्टरांचे पथक दूरध्वनीद्वारे या लोकांचा संपर्कात असतात. १४ दिवसांच्या कालावधीत या व्यक्तींमध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसून येतात का? याची नोंद ठेवली जाते.