Coronavirus : नाका कामगारांना मिळेना रोजगार, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 04:54 AM2020-03-20T04:54:28+5:302020-03-20T04:55:26+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोणताच कंत्राटदार अथवा बांधकाम व्यावसायिक नाका कामगारांना कामावर बोलवत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न नाका कामगारांच्या समोर उभा ठाकला आहे.

Coronavirus: Naka workers do not get jobs, livelihood question serious | Coronavirus : नाका कामगारांना मिळेना रोजगार, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

Coronavirus : नाका कामगारांना मिळेना रोजगार, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

Next

- ओम्कार गावंड
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निम्मी मुंबई लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम अनेक उद्योगधंद्यांवर पडला असून नाका कामगारदेखील यातून सुटलेले नाहीत. दररोज मिळणारी मजुरी हे नाका कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोणताच कंत्राटदार अथवा बांधकाम व्यावसायिक नाका कामगारांना कामावर बोलवत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न नाका कामगारांच्या समोर उभा ठाकला आहे.

मुंबईतील विविध नाक्यांवर दररोज सकाळी अनेक महिला व पुरुष कामगार कामाच्या शोधात उभे असतात. या कामगारांना शहरांमध्ये सुरू असलेल्या विविध बांधकाम, खोदकाम, रंगकाम, सुतारकाम, प्लंबिंग या ठिकाणी कामे मिळतात. दिवसाच्या शेवटी कामगारांना तीनशे ते चारशे रुपये मिळतात व याच पैशांवर त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. परंतु मागील आठवड्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून नाका कामगारांना कोणीच कामावर बोलावत नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पूर्व उपनगरातील चेंबूर नाका, मानखुर्द, विक्रोळी पार्क साईट, घाटकोपर राजावाडी, वाशीनाका, कुर्ला सिग्नल या ठिकाणी दररोज शेकडोच्या संख्येने नाका कामगार उभे असतात. कोरोनाच्या भीतीने अनेक कामगार गावी निघून गेले आहेत. परंतु अनेक कामगारांना राहण्यासाठी स्वत:चे घरदेखील नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईतील विविध खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी घरी बसून काम केले तरीदेखील त्यांचा पगार मात्र वेळेवर मिळणार आहे. परंतु आमचे पोट हातावर असल्याने आमच्यासाठी उत्पन्नाचा दुसरा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे सरकारने आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन आमच्यासाठी उपाययोजना करायला हवी, अशी मागणी चेंबूर नाक्यावरील कामगार मोहम्मद अकबर खान यांनी केली आहे.

‘आधीच हाताला काम नाही’
शंभर माणसांचे काम एक मशीन करीत आहे; त्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही. त्यात अनेक कंत्राटदार परप्रांतातून कामगार आणत आहेत. ते कामगार कमी मजुरीमध्ये काम करीत असल्याने स्थानिक कामगार अडचणीत आहे. अशातच कोरोनाच्या साथीमुळे आमचा रोजगार बंद झाला आहे, असे मानखुर्द येथील कामगार विलास शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus: Naka workers do not get jobs, livelihood question serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.