मुंबई – जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव देशातही झपाट्याने होत आहे. भारतात कोरोना पीडितांची संख्या १३० च्या जवळ पोहचली असताना महाराष्ट्रात सर्वाधिक ४२ रुग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, खासगी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी असे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णाची नावं जाहीर करु नये कारण त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाण्याची भीती आहे, ती काळजी माध्यमांनी घ्यावी असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोनाग्रस्तांची नावे जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, कोरोनाग्रस्त रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत, त्यांना एचआयव्हीसारखा आजार नाही. त्यांना कुणीही वाळीत टाकणार नाही. यातून समाज सकारात्मक भूमिका घेईल. ही नावे जाहीर केल्यास समाजात जनजागृती वाढेल. जी लोक अशा व्यक्तींच्या संपर्कात असतील ते जागरुक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी नागपूरात जो कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यांच्यावर दुर्दैवाने बिकट परिस्थिती ओढवली आहे. त्यांच्याकडे मोलकरीण नाही. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सामाजिक बहिष्कार टाकल्यासारखे वागत असल्याचं समोर आलं. त्यानंतर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी या कुटुंबाची भेट देत म्हणाले की, बहिष्कार टाकणे हे अयोग्य आहे. अशा परिवाराला काळजी घेत भेटल्यास आपल्याला कोणताही अपाय होणार नाही. परिवाराला धीर देणे, त्या परिवाराच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, कुटुंबीयांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर, चिंता करू नका. संपूर्ण शहर आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांना दिला होता.
तर पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची यादी सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून ही नावे जाहीर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मनसेच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं गरजेचे आहे.