CoronaVirus : नेव्हल डॉकयार्डने विकसित केली ताप ओळखणारी आयआर गन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:01 PM2020-04-02T14:01:50+5:302020-04-02T14:24:57+5:30
CoronaVirus : नेव्हल डॉकयार्डने या गनला विकसित केले असून इन्फ्रा रेड तत्वावर सेन्सरद्वारे ही गन काम करते.
मुंबई : कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी व्यक्तीला ताप आहे का हे थर्मल गन द्वारे तपासले जाते. मात्र सध्या त्याला जास्त मागणी असल्याने ते उपकरण सहजरित्या उपलब्ध होत नाही व त्याची किंमत देखील अव्वाच्या सव्वा आकारली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नेव्हल डॉकयार्ड ने कमी किंमतीत तयार होणारी तापमान शोधक गन विकसित करुन त्याची निर्मिती केली आहे. अवघ्या हजार रुपयात ही गन तयार केली जात आहे.
नेव्हल डॉकयार्डने या गनला विकसित केले असून इन्फ्रा रेड तत्वावर सेन्सरद्वारे ही गन काम करते. नेव्हल डॉकयार्डमध्ये दररोज सुमारे वीस हजार कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारा ने प्रवेश करतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आले. नेव्हल डॉकयार्ड मध्ये याची निर्मिती एक हजार रुपयांमध्ये केली जात आहे.
बाजारात सध्या मिळत असलेल्या थर्मल गन पेक्षा याची किंमत अत्यंत कमी आहे. सध्या कोरोनाने जगभराला विळखा दिला आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण दररोज सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे मोठी वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती तयार झाली आहे.
285 वर्षे जुन्या असलेल्या नेव्हल डॉकयार्ड मध्ये दररोज सुमारे वीस हजार जण प्रवेश करतात. कोरोना चे प्राथमिक लक्षण ताप असल्याने व्यक्तीच्या शरीराचे तापमान निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्याला बाजूला करुन उपचारांसाठी पाठवण्यात येते. त्यासाठी व्यक्तीशी संपर्क न होता शरीराचे तापमान तपासण्यासाठी थर्मल गनचा वापर केला जातो.
मोठ्या संख्येने सध्या या उपकरणाची गरज असताना त्याची किंमत वाढवल्याने कमी किंमतीत तयार होणाऱ्या या उपकरणामुळे देशभरात मोठी गरज भागवली जावू शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 0.02 सेल्सियस पर्यंतचे तापमान नोंदवण्याची या गनची क्षमता आहे. या थर्मामीटर गनमध्ये इन्फ्रारेड सेन्सर बसवलेले असून एलईडी डिस्प्लेवर तापमान दर्शवले जाते. 9 व्ही क्षमतेच्या बँटरीवर ही गन काम करते. कमी किंमतीत ही गन तयार केल्याने नेव्हल डॉकयार्ड च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नेव्हल डॉकयार्डने संशोधन करुन ही गन विकसित केली आहे. ही गन आवश्यकतेनुसार सरकारी कार्यालयांसाठी तयार करण्याचा विचार केला जाईल.
-कमांडर मेहूल कर्णिक,
जनसंपर्क अधिकारी, नौदल