Join us

Coronavirus: ‘दादा, कोरोनाचा धोका साठीच्या वरील लोकांना अधिक, त्यामुळे बाहेर फिरू नका’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 5:08 PM

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सवाल केला होता.

ठळक मुद्देकोरोना संकटातही भाजपा राष्ट्रवादीत जुंपलीकोरोनाच्या लढाईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं योगदान काय?चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला जयंत पाटलांचे उत्तर

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना भाजपा आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यमान मंत्री जयंत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हे दोन पाटील कोरोना संकटातही एकमेकांवर शरसंधान साधत आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सवाल केला होता. जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, त्याची गरज सगळ्यात जास्त आहे. कोरोना संकटाच्या लढाईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यावरुन जयंत पाटील यांनीही चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे.

यावर जंयत पाटील म्हणाले की, चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते असा चिमटा काढत भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे  फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल असा टोला त्यांना लगावला.

त्याचसोबत दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागल तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला अशा शब्दात जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी फिरकी घेतली.  

भाजपाचे सर्व नेते, आमदार, खासदार, सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी स्वत: हे काम करत आहेत. कोरोन विरुद्धची लढाई भाजपा पूर्ण गांभिर्याने लढत आहे. मुख्यमंत्र्यांकडे अजून दोन महिने आमदारकीसाठी आहेत. मात्र हा ठराव मंत्रिमंडळाने मे जूनमध्ये केला असता तरी चालणार होते. आता कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली हा माझा प्रश्न होता. आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलजयंत पाटीलभाजपामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस