मुंबई : राज्यासह मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे, मात्र या स्थितीत यंत्रणांनी अधिक खबरदारी बाळगून रुग्णांच्या अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे भविष्यातील संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.
साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील १० ते १५ व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून ही संख्या वाढवून ती २० एवढी करावी, त्यांचे तातडीने अलगीकरण करून स्वॅबचा नमुना घेऊन तो त्वरित तपासणीसाठी पाठवावा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच दिले आहेत.
याविषयी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले, रुग्णांच्या सहवासातील अतिजोखमीचे आजार असणाऱ्या आणि लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या तपासण्या करण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून यात लक्षणे किंवा लक्षणविरहित रुग्णांचे वेळीच निदान करण्यास, परिणामी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा घालण्यास मदत होईल. सहवासितांचा शोध घेण्याचे सर्वात मोठे आव्हान अधिक लोकसंख्येच्या परिसरात आहे, तसेच एका व्यक्तीमुळे तिघांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो हे वेळीच ओळखून झोपडपट्टी व चाळींच्या परिसरात सहवासितांचा शोध घेण्यावर भर दिला पाहिजे.
संसर्ग टाळण्यासाठी हे कराकोरोनाची लस येईपर्यंत आपण मास्क वापरणे, हात धुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोनाच्या प्रादुर्भावापासून स्वत:ला दूर ठेवूया. जगभरातील देशात लाट ओसरली आहे, असे वाटत असतानाच दुसरी लाट आल्याचे उदाहरण असल्यामुळे आपल्याला अधिक सजग राहिले पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.