Join us

Coronavirus: मरणानंतरही उपेक्षाच; कोरोनाबाधित रुग्णाच्या दफनविधीला विरोध, पोलिसांनी केली मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 3:09 AM

स्मशानभूमीत वाद; पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विधी उरकला

मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास विरोध करण्यात आल्याने स्मशानभूमीतच वाद झाल्याची घटना वांद्रे येथील नौपाडा कोंकणी कब्रस्तानमध्ये घडला. अखेर पोलिसांनी यात मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह दफन करण्यात आला असून विरोध करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मरणानंतरही स्थान मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

वांद्रे येथील नौपाडा भागात राहणारे शेख इजाज शमशुद्दीन (४४) यांच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हे समाजसेवक असून नौपाडा कोंकणी कब्रस्थानच्या नऊ ट्रस्टींपैकी एक आहेत. त्यांंनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानुुसार पालिका परवानगीने त्यांना वांद्रे पश्चिमेकडील नौपाडा कोंकणी कब्रस्थान येथे दफन करण्यासाठी आणले होते. मात्र मृतदेह दफन करण्यापूर्वी संजय नाईक व त्यांचे तीन साथीदार तसेच मुजफ्फर जरीफ खान युनुस मुजफ्फर खान अकबर जरीफ खान हे त्या ठिकाणी आले व गर्दी जमवून विरोध केला. कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे येथे दफन करू नये म्हणून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली; आणि मारण्याची धमकी दिली. त्यामुळे स्मशानभूमीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता त्याच ठिकाणी संबंधित रुग्णाला दफन करण्यात आले. याबाबत पोलिसांना समजताच वांद्रे पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी शेख यांच्या तक्रारीवरून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांनी आरोपींविरुद्ध ३४१, २६९, २७०, १८८, ५०४ तसेच रोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वीदेखील मृतदेह दफन करण्यास विरोध केल्याचे शेख यांनी म्हटले आहे....तर पालिकेचा असाही गोंधळमुंबई महानगरपालिकेने सदर मृतदेह दफन करण्यासाठी वांद्रे पूर्व येथील कब्रस्थानात दफन करण्याची परवानगी दिली होती. परंतु ती नजरचुकीने झाल्याचे लक्षात आल्याने दफन झाल्यानंतर सदरची परवानगी बदलून ती नौपाडा कोंकणी कब्रस्थान येथे असल्याची करून देण्यात आली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका