Coronavirus: मुंबईतल्या रस्त्यांवर थुंकल्यास आता भरावा लागणार 1000 रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:46 PM2020-03-18T12:46:40+5:302020-03-18T12:51:18+5:30
रस्त्यावर किंवा मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यासाठी रस्त्यांवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे.
मुंबई- कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशातील विविध राज्यांत वेगानं पसरतो आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. मुंबईत महापालिकेनं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. तसेच रस्त्यांवर थुंकल्यास आता नागरिकांकडून 1000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. रस्त्यावर किंवा मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यासाठी रस्त्यांवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे.
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18वर पोहोचली असून, राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 42 झाला आहे. कोरोना विषाणूचा पहिला बळी काल मुंबईत गेला. दुबईहून परतलेल्या एका 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि आता पुण्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42 झाली आहे.
लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. गर्दी कमी करावी. अन्यथा आम्हाला इच्छा नसतानाही कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुख्यमंत्री काल म्हणाले होते. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहावीत. मात्र इतर वस्तूंची दुकानं बंद करावीत, अशी विनंती त्यांनी दुकानदारांना केली. दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या सिद्धिविनायक, शिर्डी देवस्थान समित्यांचे यावेळी त्यांनी आभार मानले. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवडाभर सुट्टी देण्यात आलेली नाही. सरकारी कार्यालयं सुरूच राहतील, हेदेखील त्यांनी सांगितलं.
सरकारी कार्यालय 7 दिवस बंद राहणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये, लोकलसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे बंद करण्याचे शक्य नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. हातावर पोट असलेल्या गरिबांसाठी या सेवा महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे, अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.