Join us

Coronavirus: नवी मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकला; आव्हाडांची निवडणूक आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 9:52 AM

राज्यात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी होत असतानाच, आता नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी केली आहे.

निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरीक एकमेकांच्या संपर्कात येतील त्यामुळे या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आव्हाड यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे. कोरोना व्हायरसची भीती पाहता महापालिका निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी. तसेच निवडणूक पुढे ढकलताना पालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Coronavirus: औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला; महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आतपर्यंत राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 14 रुग्णांची नोंद झाली. यापैकी पाच नवे रुग्ण पिंपरी-चिंचवड या भागात आढळून आले आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिली.