Join us

coronavirus : राज्यातील कोरोनाबधितांवर होणार या नव्या पद्धतीने उपचार, केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 9:54 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी कोरोनाबाधितांवरील उपचार पद्धतीबाबत त्यांनी जनतेला माहिती दिली.

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा ट्रिटमेंट पद्धतीने उपचार करण्यासाठी तयारी करण्यात आली आहेकोरोनाबाधित रुग्णांचे होत असलेले मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहेमहाराष्ट्राने संकटसमयी नेहमीच देशाला दिशा दाखवली आहे. न जाणो पुढे जगाला दिशा दाखवू

मुंबई - देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या आणि 3 मे पर्यंत वाढलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांसोबतच इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला दिली. तसेच पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे कोरोनावर उपचार करण्यासाठी संशोधन सुरू असून, कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा ट्रिटमेंट पद्धतीने उपचार करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. आता त्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात आणि मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचे होत असलेले मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा पद्धतीचा अवलंब करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. महाराष्ट्राने संकटसमयी नेहमीच देशाला दिशा दाखवली आहे. न जाणो पुढे जगाला दिशा दाखवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, राज्यात आणि मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र असे असतानाच आज संध्याकाळी मुंबईतील वांद्रे येथे परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी उसळल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणासही सुरुवात झाली होती. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील प्रकारावर मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'परप्रांतीय कामगारांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. मात्र तरीही काहीजण आपल्या घरी परतण्यास इच्छुक आहेत. मात्र कुणीही राज्याबाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रात आहात. तुम्हाला बंदिस्त करून ठेवण्याची आमची इच्छा नाही. आपण सर्वजण मिळून या संकटाचा सामना करूया.'

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्रवैद्यकीय