Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवदाम्पत्य बजावतेय मोलाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:11 PM2021-05-08T17:11:24+5:302021-05-08T17:12:03+5:30
Coronavirus in Mumbai: या नवंदाम्पत्याने हनीमूनला जाण्याऐवजी प्रभागात सतर्क राहून येथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - एकीकडे राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात असतांनाच राजकीय नेत्यांचे वाढदिवस,लग्नसोहळा धुमधडाक्यात झाल्याची उदाहरणे आहेत. लग्नाला फक्त 25 माणसे असावीत आणि लग्न सोहळा दोन तासात संपला पाहिजे अशी नियमावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जारी केलेल्या कोरोना नियमावलींचे पालन करत मुंबई महानगर पालिकेचे विधी व महसूल समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 6 चे शिवसेना नगरसेवक हर्षद कारकर यांनी त्यांचा विवाह सोहळा मोजून 25 माणसांमध्ये साधेपणाने नुकताच साजरा केला. लग्नाला वडीलधारे म्हणून म्हाडाचे सभापती व शिवसेना उपनेते डॉ.विनोद घोसाळकर उपस्थित होते.
उच्च शिक्षित असलेले हर्षद कारकर हे 2017 च्या पालिका निवडणुकीत वयाच्या 22 व्या वर्षी नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. हर्षद यांचे लग्न दि,22 एप्रिल रोजी झाले, त्यावेळी मुंबई लसह प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता. या नवंदाम्पत्याने हनीमूनला जाण्याऐवजी प्रभागात सतर्क राहून येथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली.
आपल्या प्रभागातच थांबून येथील नागरिकांना बेड मिळवून देणे, नागरिकांना,जेष्ठ नागरिकांना लसीकरणात मदत करणे,गरजू नागरिकांना ऑक्सिजन मिळवून देणे,नाले सफाईच्या कामाची पाहणी करणे,नागरी समस्या जाणून त्या सोडवणे, या कामाला विशेष महत्व देत हर्षद कारकर आणि त्यांच्या पत्नी दिक्षा संखे-कारकर हे दोघे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी येथील नागरिकांना दिलासा दिला.
हर्षद यांचे वडिल प्रकाश कारकर यांचे गेल्या वर्षी दि,9 ऑक्टोबरला निधन झाले. त्यापूर्वी दि,7 ऑक्टोबरला त्यांची विधी समिती अध्यक्षपदी निवड झाली. हर्षदचे वडील दिवंगत प्रकाश कारकर हे 2002 ते 2012 पर्यंत नगरसेवक होते.तर 2015 ते 2017 पर्यंत ते विभाग क्रमांक 1 चे विभाग प्रमुख होते. वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारत एकीकडे विधी व महसूल समिती अध्यक्षपदाची धुरा संभाळत दुसरीकडे प्रभागात लगेच त्यांनी जोमाने कामाला सुरवात केली. आता त्यांची पत्नी दिक्षा देखिल आपल्या पती बरोबर समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 6 कोरोनामुक्त करण्यासाठी हर्षदला मोलाचे सहकार्य करत आहे. रस्त्यावर उतरून कोरोना मुक्ती साठी काम करणाऱ्या या नवदांपत्याचे सध्या प्रभागात कौतुक होत आहे.