CoronaVirus News : राज्यात दिवसभरात १२०२ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंतची उच्चांकी संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 04:50 AM2020-05-20T04:50:25+5:302020-05-20T04:50:41+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : राज्यात ६७ प्रयोगशाळांच्या माध्यमातून दिवसाला सुमारे १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. राज्याचा कोरोनाचा मृत्यूदर हा ३.२ टक्के एवढा असून रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
मुंबई : राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येने मंगळवारी आतापर्यंतची उच्चांकी संख्या गाठली. राज्यभरात आज एकाच दिवशी कोरोनाच्या बºया झालेल्या १२०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९ हजार ६३९ झाली आहे. बरे होण्याचा राज्यातील दर सुमारे २५ टक्के असून कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही १४ दिवसांवर नेण्यात आरोग्य व्यवस्थेला यश आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात ६७ प्रयोगशाळांच्या माध्यमातून दिवसाला सुमारे १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. राज्याचा कोरोनाचा मृत्यूदर हा ३.२ टक्के एवढा असून रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. आज दिवसभरात २ हजार १२७ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली आहे. तर, दिवसभरात ७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात ५० पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. आजच्या ७६ मृत्यूंमध्ये ३० जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत. तर ३९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. सात जण ४० वर्षांखालील आहेत. या ७६ रुग्णांपैकी ५८ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. ७६ पैकी ३२ मृत्यू मागील चोवीस तासांतील तर उर्वरित संख्या पंधरवड्यातील आहे. एकूण मृतांमध्ये मुंबईमध्ये ४३, ठाणे शहरात १५, पुण्यात ६, अकोल्यात ३, नवी मुंबईमध्ये २, बुलडाणा २, नागपूर शहर २ तर औरंगाबाद, धुळे आणि नाशिक शहरात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,९३,९९८ नमुन्यांपैकी २,५६,८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर ३७,१३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १७६५ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १५,१७८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६३.२९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ३,८६,१९२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून २१,१५० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
रुग्णसंख्या
५० लाखांजवळ
कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, मंगळवारी जगभरात रुग्णांची संख्या ४९ लाख ३० हजारांच्या पुढे गोली. सोमवारी हा आकडा ४८ लाख ३८ हजार होता. तसेच २४ तासांत मृतांची संख्या ३ हजार ५०० ने वाढून ३ लाख २१ हजारांवर गेली. आतापर्यंत १९ लाख ३० हजारांवर रुग्ण बरे झाले आहेत आणि २६ लाख ७७ हजार जणांवर उपचार सुरू आहेत.
एक लाखापैकी
७३ हजार रुग्ण
पाच राज्यांत
देशातील रुग्णांची संख्या १ लाख १,१३९ झाली असून त्यापैकी सुमारे ७३ हजार रुग्ण केवळ पाच राज्यांतच आहेत. सर्वाधिक ३५ हजार रुग्ण महाराष्ट्रात असून, त्याखालोखाल तामिळनाडू (११, ७६०), गुजरात (११,७४५), (दिल्ली १०,०५४) आणि राजस्थान (५५०७) या राज्यांत रुग्ण आहेत.