Join us

CoronaVirus News : राजभवनाचे १४ कर्मचारी पॉझिटिव्ह, ६० जणांचा अहवाल येणे बाकी

By यदू जोशी | Published: July 12, 2020 4:03 AM

राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे.

- यदु जोशी

मुंबई : राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाला असून, चाचणीचा अहवाल प्राप्त झालेल्या ४० कर्मचाऱ्यांपैकी १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आणखी ६० जणांचा अहवाल येणे बाकी आहे.अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी, तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इथे कार्यरत एका इलेक्ट्रिकल शाखा अभियंत्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी झाली. हे सर्व कर्मचारी राजभवन परिसरातील क्वॉर्टर्समध्ये राहतात. प्राप्त माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी १०० जणांचे स्वॅब घेतले आहेत. शनिवारी सायंकाळी ४० जणांचे अहवाल प्राप्त झाले व त्यातील १४ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता सर्व कर्मचाºयांच्या कुटुंबियांचीसुद्धा कोरोना चाचणी होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

चिंताजनक! राज्यात कोरोनाचे १० हजारांहून अधिक बळी राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. शनिवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच ८ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात कोरोनामुळे २२३ बळी गेले. राज्यात कोरोनाच्या मृत्यूंनी १० हजारांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत एकूण १० हजार ११६ बळी गेल्याची नोंद आहे. सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण २ लाख ४६ हजार ६०० बाधित रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के झाले असून मृत्यूदर ४.१ टक्के आहे. राज्यात अतिजोखमीच्या आजारांमुळे ७० टक्के रुग्णांचे मृत्यू झाले असून ३० टक्के मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. एकूण मृत्यूंमध्ये ६५ टक्के पुरुष तर ३५ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस