देशभरात प्रदूषणामुळे 17 लाख जणांचा मृत्यू; अनलाॅकनंतर पुन्हा झाली प्रदूषणात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:37 AM2020-12-28T01:37:56+5:302020-12-28T06:59:00+5:30
विळखा कायम; अनलाॅकनंतर पुन्हा झाली प्रदूषणात वाढ
- सचिन लुंगसे
मुंबई : कोरोनाला हरवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले असले, तरी अनलाॅकनंतर पुन्हा एकदा प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. २०१९ सालीही वाढलेल्या प्रदूषणाने कहर केला असून, २०१९ साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल १७ लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचे लांसेंट हेल्थ जर्नलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
देशभरातील १७ लाख नागरिकांच्या मृत्यूचे टक्केवारीतील प्रमाण हे १७.८ आहे. देशभरातील प्रदूषणात इन डोअर आणि आउट डोअर प्रदूषणाचा समावेश असून, ओझोन प्रदूषणाचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकाराचे प्रदूषणही सातत्याने प्रदूषणात भर घालत आहे. खुल्या जागेवरील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या प्रदूषणामुळे ९ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे ६ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, १९९० पासून २०१९ सालाचा विचार करता, बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे ६४.२ टक्क्यांनी घटले आहे, तर बाहेरील प्रदूषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे ११५.३ टक्क्यांनी वाढले आहे.
ओझोन प्रदूषणाचा विचार करता, हे प्रमाण १३९.२ टक्क्यांनी वाढले आहे.थोडक्यात, बंदिस्त जागेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी असून, रस्ते, सार्वजनिक जागा येथील तत्सम ठिकाणांवरील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असून, सूत्रांच्या म्हणण्यानुसार धूम्रपानामुळे जेवढे मृत्यू होतात, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक मृत्यू हे प्रदूषणामुळे होत आहे. दरम्यान, प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच, आर्थिक तोट्यातही भर पडत असल्याने मनुष्यहानीसह आर्थिक असे दुहेरी नुकसान होते आहे.