CoronaVirus News: मुंबईत फेब्रुवारीमध्ये १८ हजार तर मार्चमध्ये तब्बल ८८ हजार रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 03:04 AM2021-04-10T03:04:21+5:302021-04-10T07:21:37+5:30
मार्चच्या १० तारखेनंतर दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ही रुग्णवाढ ४७५ टक्क्यांनी जास्त आहे.
- स्नेहा मोरे
मुंबई : मुंबईत जानेवारीत १६ हजार ३२८, फेब्रुवारीत १८ हजार आणि मार्चमध्ये तब्बल ८८ हजार रुग्णांचे निदान झाले आहे. रुग्णवाढीचा हा दर ०.२८ वरून १.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. साहजिकच प्रशासनावरचा ताण प्रचंड वाढला आहे. लसीकरणाला वेग देण्यात आला असला तरी दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
चिंतेचे वातावरण
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या १० तारखेनंतर दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ही रुग्णवाढ ४७५ टक्क्यांनी जास्त आहे.
१४ लाखांहून अधिक नागरिकांना लस
मुंबईत ५ एप्रिलपर्यंत एकूण १४ लाख ११ हजार ३१८ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यात १२ लाख ४७ हजार ९० नागरिकांना पहिला तर १ लाख ६४,०३८ जणांना दुसरा डोस देण्यात आला.
लसीकरण केंद्राची क्षमता वाढविणार
१०८ ठिकाणी लसीकरण होत असून, दिवसाला ४० ते ४५ हजार लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. ही केंद्रांची संख्या वाढवून ११५ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
केंद्राकडे पाठपुरावा सुरू
पालिकेने लसीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याने केंद्र सरकारकडे लसीचा पुरवठा करण्यासाठी पत्र दिले आहे. लस मिळावी यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करीत आहोत. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
...तर महिनाअखेरीस रोखता येईल संसर्ग
सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासह लक्षणे असलेल्या व नसलेल्या गटातील रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांनी विलगीकरण व वैद्यकीय उपचार पद्धतीचे योग्य प्रकारे पालन केले तर कोरोनाच्या या लाटेवर एप्रिलअखेरपर्यंत नियंत्रण मिळविता येईल. लोकांनी स्वतःची जबाबदारी आता तरी ओळखायला हवी. - डॉ. शशांक जोशी, कोरोना टास्क फोर्स
केंद्रीय पथकाच्या पाहणीत झोपडपट्ट्यांपेक्षा रहिवासी इमारतींमधील रुग्णसंख्या तुलनेने जास्त असल्याचे दिसून आले.
जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत २३ हजारांहून रुग्ण महानगरपालिका क्षेत्रात आढळले.
यापैकी सुमारे ९० टक्के रुग्ण हे निवासी इमारतींमध्ये राहणारे आहेत. तर उर्वरित १० टक्के हे झोपडपट्टीतील आहेत.
ठाणे जिल्ह्यात तीन महिन्यांमध्ये ७५ हजारांवर रुग्ण
- सुरेश लोखंडे
ठाणे : देशात सर्वाधिक महापालिका असलेल्या ठाणे जिल्ह्यात ३ महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या ७५,८३३ झाली आहे. यातील ५४,९३ रुग्ण एकट्या मार्चमधील आहेत. जानेवारीपासून ९३० जणांना जीव गमवावा लागला असून, त्यातील सर्वाधिक ६१६ मृत्यू मार्चमध्ये झाले आहेत. त्यामुळेच आता सहा महापालिकांची यंत्रणा खडबडून जागी होत रस्त्यावर उतरली आहे.
७०% रुग्णांचे घरातच विलगीकरण
ठाणे सिव्हिल रुग्णालयासह महापालिकांच्या व जिल्हा परिषदेच्या ३,४४२ लसीकरण केंद्रांवर १.२५ लाख जणांच्या लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर ६०,९२३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. खासगी रुग्णालयात ४,६७,७५८ जणांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी लसीकरणाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. कोठेही लसीची कमतरता नाही.
- कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक,
सिव्हिल रुग्णालय, ठाणे.