CoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 05:01 AM2020-05-27T05:01:38+5:302020-05-27T08:28:07+5:30
राज्यात दिवसभरात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्य झाला.
मुंबई : राज्यात मंगळवारी २०९१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या ५४ हजार ७५८ झाली आहे. तर, आज ११६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६,९५४ इतकी झाली आहे.
राज्यात दिवसभरात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्य झाला. मृतांमध्ये ६३ पुरुष तर ३४ महिला असून मुंबईमध्ये ३९, ठाण्यात १५, कल्याण डोंबिवलीमध्ये १०, पुण्यात ८, सोलापुरात ७, औरंगाबादमध्ये ५, मीरा भार्इंदरमध्ये ५, मालेगावमध्ये ३ आणि उल्हासनगरमध्ये ३, तर नागपूर शहर १ आणि रत्नागिरीमधील एकाचा समावेश आहे.
मृत ६५ जणांमध्ये (६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यात मत्युमुखी पडलेल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,७९२ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासणीसाठी आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3,90,170 नमुन्यांपैकी 54,758 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
5,67,622 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून 35,200 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
भारतातील मृत्यूदर 2.78 %
महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, भारतातील एकूण रुग्णांचा आकडा मंगळवारी १ लाख ४५ हजारांवर पोहोचला. देशात रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ४१.६१ टक्के असून, मृत्यूदरही २.८७ टक्क्यांवर आला आहे. जगातील हा सर्वात कमी मृत्यूदर आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मंगळवारी ५,७११ रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ५0५ झाली, तर १९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने भारतात एकूण मृतांची संख्या ४,२६८ झाली असून, ६३ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तामिळनाडूत आणखी नऊ जणांचा मृत्यू झाल्याने येथील मृतांच्या संख्या १२७ झाली असून, रुग्णांचा आकडा १७ हजारांवर गेला आहे. गुजरातमध्ये आणखी २७ जण दगावल्याने मृतांची संख्या ९१५ झाली असून, एकूण रुग्णांची संख्या १४,८२९ झाली आहे. दिल्लीतही मृतांची संख्या २८८ झाली.
जगात 49,000 रुग्ण वाढले
जगभरात गेल्या चोवीस तासांत आणखी ४९,१९६ रुग्णांची भर पडली असून १,४६० लोकांचा मृत्यू झाला. जगभरातील एकूण मृतांची संख्या ३ लाख ४९ हजारांवर पोहोचली आहे. रुग्ण आणि मृतांच्या संख्येनुसार अमेरिका अग्रणी आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णांचा आकडा १७,१०,९४१ असून, आतापर्यंत ९९,९५० लोक मरण पावले आहेत. त्या खालोखाल असलेल्या ब्राझीलमध्ये २३ हजार जणांचा मृत्यू झाला असून, रुग्ण संख्या ३,७७,७११ झाली आहे. रशियात आतापर्यंत ३,८०७ रुग्ण दगावले असून, एकूण रुग्णसंख्या ३ लाख ६२ हजारांवर आहे. स्पेन, इटली, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेत गेल्या २४ तासांत रुग्णवाढ नाही.