मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यभरात १३१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २,०९५ वर पोहोचला आहे.
राज्यातील गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत २२ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. यात मुंबईतील १३ पोलिसांचा समावेश आहे. २३६ अधिकारी, १,८५९ अंमलदार मिळून एकूण २,०९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८७९ उपचाराअंती बरे झाले आहेत. यात ७५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाउनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी, रुग्णालयांबाहेरील बंदोबस्त, कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांच्या जबाबांसह तपशिलांची नोंदणी, बेवारस मृतदेहांवरील अंत्यसंस्कार, मास्क न लावता बाहेर भटकणाऱ्यांची धरपकड, अशी सर्व जबाबदारी पोलिसांवर आहे. याशिवाय स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीपासून पाठवणीपर्यंतची प्रक्रियाही त्यांच्याकडूनच पूर्ण केली जात आहे. त्यातच आता केंद्राच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय साहाय्य योजनेंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या विस्थापितांना शोधण्याची जबाबदारीही पोलिसांवर सोपविण्यात आली आहे.
पोलिसांचे एक पथक आता या कामाला लागले आहे. अशा प्रकारे रस्त्यावर उतरून एक ना अनेक पातळ्यांवर कोरोना योद्धा म्हणून पोलीस जबाबदारी पार पाडत आहेत. डॉक्टर, नर्सेस यांना दिले जाणारे पीपीई किट पोलिसांना दिले जात नसल्याने त्यांना बाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे.
मुंबई पोलीस दलात १४ वा बळी
मुंबई पोलीस दलात कोरोनामुळे गुरुवारी आणखी एका पोलीस अंमलदाराला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंतचा हा १४ वा बळी आहे. मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ५२ वर्षीय पोलीस अंमलदाराला ताप येत असल्याने २० मे रोजी शिवम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना डिस्चार्ज मिळाला. तरीही ताप येत असल्याने त्यांनी जे.जे. रुग्णालयात कोरोना चाचणी केली.