मुंबई: राज्यात सलग दोन दिवस कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांहून अधिक असल्याची नोंद झाल्याने चिंतेचे वातावरण होते. त्या चिंतेत आता आणखी भर झाली आहे. राज्यभरात आज ३० हजार ५३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच ९९ जणांचा दिवसभरात मृत्यू झाला असल्याची माहिती, राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.
आज गेल्या २४ तासांत राज्यात ३० हजार ५३५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये एकूण ११ हजार ३१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख १० हजार १२० वर जाऊन पोहचली आहे. (30,535 new corona cases and 99 deaths in the last 24 hours in maharashtra)
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८३ लाख ५६ हजार २०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख ७९ हजार ६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ६९ हजार ८६७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ९ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
पुणे शहरात रविवारी २ हजार ९०० नव्या कोरोनाबाधितांची वाढ-
शहरात कोरोनाबाधितांची वाढ कायम असून, रविवारी नव्याने २ हजार ९०० रूग्णांची भर पडली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही १२ हजार ९२९ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे. तपासणीच्या तुलनेत आज २२़.४३ टक्के रूग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २२ हजार ५२४ इतकी झाली आहे. सध्या शहरात ५१९ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. ९५५ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत. आज दिवसभरात १ हजार २४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आज दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत.