CoronaVirus News: राज्यात दिवसभरात 3442 कोरोनाबाधितांची नोंद; रिकव्हरी रेट 93.60 टक्क्यांवर
By मुकेश चव्हाण | Published: December 15, 2020 09:01 PM2020-12-15T21:01:08+5:302020-12-15T21:04:22+5:30
राज्यात आतापर्यंत 48 हजार 339 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3442 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 71356 पर्यत खाली आली आहे. तसेच आज 4395 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत 48 हजार 339 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 17,66,010 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 93.60 टक्क्यांवर पोहचला आहे.
राज्यात आज 3442 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4395 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1766010 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 71356 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.60% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 15, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 18 लाख 06 हजार 808 चाचण्यांपैकी 18 लाख 86 हजार 807 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात 5 लाख 24 हजार 059 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 4 हजार 316 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 22 हजार 65 नवे रुग्ण सापडले असून, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 99 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चार महिन्यांनंतर प्रथमच देशात एवढ्या कमी संख्येने रुग्ण सापडले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरामध्ये कोरोनाचे 22 हजार 65 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 99 लाख, सहा हजार 165 एवढी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 354 जणांचा मृत्यू झाल्याने देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 709 झाली आहे.
देशात जानेवारीपासून लसीकरण?; सिरमच्या अदार पुनावालांनी दिले मोठे संकेत-
कोरोना लसीकरणावरून देशवासियांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी लसीकरणावर मोठे संकेते दिले आहेत. डिसेंबरच्या शेवटी कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
अदार पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की, या महिन्याच्या शेवटी एसआयआयला कोरोना लसीचे लायसन मिळू शकते. मात्र, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची अॅस्ट्राझिनेकासोबत मिळून ही लस विकसित करत आहे.