मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3580 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 89 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 54891 झाली आहे. तसेच आज 3171 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत 49 हजार 058 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 18,04,871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.5% टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक असणार आहे.
ब्रिटनमधून 55 नागरिक कल्याणमध्ये दाखल-
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देशात गेल्या महिन्याभरात आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. याचदरम्यान कल्याणमध्ये 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत 55 नागरिक ब्रिटनमधून परतले असून या नागरिकाची यादी राज्य शासनानं महापालिकेला धाडली आहे. या सर्वांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रिटनमधून आलेल्या 55 प्रवाशांचा शोध घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाची सुरु आहे. या प्रवाशांची नावं, पत्ते, फोन नंबरची यादी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे धाडण्यात आली असून या नागरिकांना संपर्क करून त्यांची पुन्हा चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.