CoronaVirus News: स्वॅब न तपासताच दिले ३७ बोगस कोरोना अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 02:36 AM2021-04-10T02:36:35+5:302021-04-10T02:36:55+5:30
लॅब टेक्निशियनला अटक; क्यूआर कोड स्कॅनिंगमुळे उघड झाला प्रकार
मुंबई : कोरोना चाचणीसाठी येणाऱ्या लोकांचे स्वॅब घेतल्यानंतर ते चाचणीसाठी अधिकृत लॅबला न पाठवता निव्वळ त्यांना लक्षणे विचारून कोरोना ‘पॉझिटिव्ह’ किंवा ‘निगेटिव्ह’ यापैकी एक अहवाल तयार करून देणाऱ्या लॅब टेक्निशियनला शुक्रवारी चारकोप पोलिसांनी अटक केली. क्यूआर कोडवरून शंका आल्यानंतर एका तरुणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मोहम्मद सलीम मोहम्मद उमर (२९), असे अटक करण्यात आलेल्या लॅब टेक्निशियनचे नाव आहे. ताे थायरोकेअर लॅबसाठी काम करत असून, मालवणीच्या गेट क्रमांक ८ मध्ये राहतो. चारकोप पोलीस ठाण्यात ६ मार्च, २०२१ रोजी एका १९ वर्षीय तरुणीने तक्रार देऊन तिला देण्यात आलेल्या कोरोना अहवालाबाबत संशय व्यक्त केला. त्यानुसार चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे यांनी तपास सुरू केला. या तरुणीने तिच्या कोरोना अहवालाचा क्यूआर कोड तपासला असता त्यात तिचे नावच नसल्याचे तिच्या लक्षात आले.
चारकोप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून उमरकडे चौकशी सुरू केली. त्याने कोरोना चाचणी अहवालात फेरफार केल्याचे कबूल केले. शिंदे यांनी काही अहवाल पडताळून पाहिले असता ३७ क्यूआर कोडमध्ये गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार उमरला अटक करण्यात आली. त्याने अद्याप अशाच प्रकारे अहवाल दिलेल्यांचे जबाब आम्ही नोंदवत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
‘सौम्य’ लक्षणे असल्यास द्यायचा निगेटिव्ह अहवाल
उमर हा घरोघरी जाऊन स्वॅब गोळा करत असे. त्यादरम्यान तो संबंधित व्यक्तीला लक्षणे विचारायचा. ज्यांना सौम्य लक्षणे असायाची त्यांचा अहवाल तो त्याच्याकडे असलेल्या जुन्या निगेटिव्ह अहवालासोबत ‘अॅडोब एक्रोबॅट रीडर’मार्फत एडिट करायचा आणि रुग्ण निगेटिव्ह असल्याचा अहवाल तयार करून द्यायचा. त्यासाठी ताे हजार रुपये आकारत असे.