मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3811 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 98 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 62743 झाली आहे. तसेच आज 2064 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत 48 हजार 746 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 17,83,905 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.06 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक असणार आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,21,19,196 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,96,518 चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत. व सध्या राज्यात 5,02,362 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3,730 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात जानेवारीपासून लसीकरण?; सिरमच्या अदार पुनावालांनी दिले मोठे संकेत-
कोरोना लसीकरणावरून देशवासियांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी लसीकरणावर मोठे संकेते दिले आहेत. डिसेंबरच्या शेवटी कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
अदार पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की, या महिन्याच्या शेवटी एसआयआयला कोरोना लसीचे लायसन मिळू शकते. मात्र, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची अॅस्ट्राझिनेकासोबत मिळून ही लस विकसित करत आहे.