Join us

CoronaVirus News: राज्यात गेल्या 24 तासांत 3913 कोरोनाबाधितांची नोंद; रिकव्हरी रेट 94.51 टक्क्यांवर

By मुकेश चव्हाण | Published: December 23, 2020 8:06 PM

राज्यात आतापर्यंत 48 हजार 969 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3913 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 93 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 54573 झाली आहे. तसेच आज 7620 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत 48 हजार 969 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 18,01,700 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.51% टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक असणार आहे. 

तत्पूर्वी, राज्यात 22 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी जाहीर केले आहे. या नाईट कर्फ्यूदरम्यान 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. रात्री 11 पर्यंत कोणताही नियम बदललेला नाही. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध. हे नववर्ष साधे नाहीय. त्यामुळे 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर नियंत्रण ठेवाव लागेल, असा इशाराही इकबाल चहल यांनी दिला.

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात 22 डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 

अन्य राज्यांतील प्रवाशांची रवानगी

ब्रिटनमधून येणारे 236 प्रवासी महाराष्ट्राबाहेरील असल्याने त्यांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येईल. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना कळविण्यात आले आहे, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिका