मुंबई - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर ११ डिसेंबरपासून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात येत आहे. मात्र सात दिवस हॉटेलमध्ये राहणे परवडत नसलेल्या काही प्रवाशांनी महापालिकेचा पाहुणचार स्वीकारला आहे. दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोप येथून आलेल्या सुमारे चारशे प्रवाशांना पालिकेच्या भायखळा येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन केले आहे.
ब्रिटन व अन्य देशातून आलेल्या प्रवाशांना कोरोना झालेला नाही, याची खात्री होईपर्यंत त्यांची व्यवस्था मुंबईतील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. मात्र पालिकेने निवडलेल्या हॉटेलचा सात दिवसांचा खर्च काही प्रवाशांना परवडणारा नाही. त्यामुळे आपल्या राहण्याची व्यवस्था अन्य ठिकाणी करावी, अशी विनंती पालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार भायखळा येथील केंद्रात अशा चारशे प्रवाशांचा पाहुणचार महापालिकेने केला आहे.
या जम्बो सेंटरमध्ये नाश्ता व तीनवेळा मोफत जेवण दिले जाते. क्वारंटाइन करण्यात आलेल्या प्रवाशांनी सात दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली जाते. असे आतापर्यंत ७५ हून अधिक प्रवाशांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र या केंद्रातील सर्व सेवा मोफत असून कोरोना बाधित रुग्णांना मात्र येथे ठेवण्यात येत नाही. केवळ कोरोना संशयित व्यक्तींना येथे सात दिवस ठेवण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
३२ पॉझिटिव्ह, दहा कोरोनामुक्तब्रिटनवरून २१ डिसेंबरपासून तसेच गेल्या महिन्याभरात मुंबईत आलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यंत ३२ प्रवासी बाधित असल्याचे समोर आले आहे. यापैकी दहा लोकांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या सर्वांचे नमुने ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी’कडे पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तेथून अहवाल येईपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या प्रवाशांनाही डिस्चार्ज न देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका येथून आलेले प्रवासी (३१ डिसेंबर २०२०)विमाने दाखल - १८एकूण प्रवासी - १४३५मुंबईत क्वारंटाइन - ६२७अन्य राज्यात पाठविले - ७१५वगळले - ९३