मुंबई: कोरोनाचा प्रसार गेल्या महिन्यापासून मुंबईत वाढला. दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने कोणतीही लक्षणे व गंभीर आजार नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन केले जात आहे. यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील अति जोखमीचे व्यक्ती व लक्षणे नसलेले तब्बल पाच लाख मुंबईकर होम क्वारंटाइन आहेत.
१ सप्टेंबरपासून मुंबईत रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत गेली. १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा प्रभाव आता दिसून येत आहे. सध्या २२ हजार ३६९ सक्रिय रुग्ण असून यापैकी १३ हजार २५९ रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असल्याचा दावा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे.
मार्चपासून ११ सप्टेंबरपर्यंत मुंबईत एकूण आठ लाख ८७ हजार चाचण्या झाल्या होत्या. मात्र ११ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल तीन लाख ७४ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये दररोज होणार्या सात हजार चाचण्यांचे प्रमाण आता दररोज १६ ते १८ हजारांपर्यंत वाढण्यात आले आहे. त्यामुळेच रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून येते, असा पुनरुच्चार आयुक्तांनी केला आहे.
पाच हजार खाटा रिक्त-
पालिकेची रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये ११ सप्टेंबर रोजी ८५ आयसीयूसह ४१६५ रिक्त खाटा होत्या. ११ ऑक्टोबर रोजी २५७ आयसीयू खाटांसह ४९२२ खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मार्चपासून १० ऑक्टोबरपर्यंत ३३,३५,१०६(बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकं) यापैकी १३,७८,४७४ हाय रिस्क कॉन्टॅक्टचा शोध पालिकेने घेतला.आतापर्यंत मुंबईतील २८ लाख १६ हजार ९४९ लोकांनी होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. तसेच १० सप्टेंबर रोजी दोन लाख ६२ हजार ६०३ लोकं होम क्वारंटाइन होते. १० ऑक्टोबर रोजी एकूण पाच लाख १७ हजार लोकं होम क्वारंटाइन आहेत.