मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस कमी होत असताना दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यभरात 5363 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 115 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 7836 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच राज्यात सध्या एकूण 1,31,544 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
मुंबईत देखील गणेशोत्सवानंतर वाढलेली रुग्ण संख्या आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील सर्वच २४ प्रशासकीय विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मंगळवारी शंभरी पार पोहोचला आहे. यापैकी सायन - वडाळा विभागात सर्वाधिक म्हणजे २९६ दिवसांनंतर रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. तसेच मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर अर्ध्या टक्क्यावर आला आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मालाड ते दहिसर या उत्तर मुंबई भागात रुग्णांची संख्या ४५ दिवसांमध्ये दुप्पट होत होती. तसेच ७० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवाशी असल्याचे आढळून येत होते. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस इतका झाला होता. मात्र संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी १४ सप्टेंबर रोजी ५४ दिवसांपर्यंत कमी झाला होता.
दरम्यान, देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 79 लाखांचा टप्पा पार केला असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,19,502 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 4 महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे.