मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले जात आहेत. मागील आठ दिवसात तब्बल ५५ हजार नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते रूग्ण आणि दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्या मर्यादित झाल्याने राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या ६७ हजारांवर पोहचली आहे.
वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरातही विविध निर्बंधांबाबत चाचपणी सुरू आहे. आज दिवसभरात ८ हजार ३३३ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१ लाख ३८ हजार १५४ झाली आहे. तर, दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५२ हजार ४१ नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे.
एकीकडे बाधितांचा आलेख वाढत असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाण मात्र स्थिर आहे. आज ४ हजार ९३६ जण करोनातून बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख १७ हजार ३०३ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या ६७ हजार ६०८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत तिसऱ्या दिवशी किंचित घट
मुंबईत बुधवारपासून सलग दोन दिवस ११६७ आणि ११४५ बाधित रुग्णांची नोंद झाली. यात थोडी घट होऊन शुक्रवारी १०३४ बाधित रुग्णांची नोंद झाली.
देशात १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण
देशात सलग दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी कोरोनाचे १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १० लाख ६३ हजार झाली असून, त्यापैकी १ कोटी ७ लाख ५० हजार लोक बरे झाले आहेत. १ लाख ५५ हजार रूग्ण उपचार घेत आहेत.