मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस कमी होत असताना दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात 5548 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 74 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 7303 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद आज झाली आहे.
राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 89 लाख 67 हजार चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील 16 लाख 78 हजार 406 (18.72 टक्के) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 25 लाख 37 हजार 599 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 12 हजार 342 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 15 लाख 10 हजार 353 इतका झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट आता 89.99 वर पोहचला आहे.
दरम्यान, मुंबई शहरासह उपनगरात चाचण्यांचे प्रमाण सुरळीत असून कोरोना रुग्णनिदानाचा दर घसरत चालला आहे. दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी पहिल्यांदाच मुंबईचा रुग्ण पॉझिटिव्हीटीचा दर 10 टक्क्यांच्या खाली आला होता.
संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी गरजेची
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, रुग्ण निदानाचे प्रमाण घटत असले तरीही मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि स्वच्छता राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे बदल सामान्यांनी जीवनशैलीत स्वीकारले पाहिजेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.