Join us

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६,२१८ रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 1:25 AM

CoronaVirus News: राज्यात मंगळवारी ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात काेराेनाच्या ६ हजार २१८ रुग्णांचे निदान झाले असून ५१ मृत्यूंची नोंद झाली. सध्या ५३ हजार ४०९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यात मंगळवारी ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ रुग्ण काेराेनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.सध्या राज्यात २,७९,२८८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर २,४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १० लाख २८ हजार २७१ लाभार्थ्यांना लस

राज्यात मंगळवारी पार पडलेल्या ६७१ व्या लसीकरण सत्रात एकूण ४२ हजार ३१९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यापैकी ३० हजार ७८९ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे व ११ हजार ५३० लाभार्थ्यांना दुसरा डाेस देण्यात आला. ७ हजार ७७१ आरोग्य कर्मचारी आणि २३ हजार १८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले.

विदर्भाच्या सीमेवर तपासणीसाठी छावणी

सोळा तालुके व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून आता जिल्ह्याच्या यवतमाळ सीमेवर तपासणी छावणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांना जिथल्या तिथे सुरक्षित राहता येईल व त्यांच्यावर आवश्यकतेनुसार वेळीच उपचार करणे सोईचे होईल या उद्देशाने ही छावणी सुरू करण्यात येत आहेेे. प्रवाशांच्या वाहतुकीवरील नियंत्रणासह लोकांना समुपदेशनाचेही काम या ठिकाणी करण्यात येणार आहे. पोलिसांच्या या छावणीत कोरोना चाचणी करता यावी यासाठी एक वैद्यकीय पथक राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई