CoronaVirus News : धक्कादायक! ७२ रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 05:05 PM2020-06-03T17:05:43+5:302020-06-03T17:07:40+5:30
मध्य रेल्वेच्या ४१ आणि पश्चिम रेल्वेवरील ३१ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या ३१९ असून सर्वाधिक आहे. तर, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या रेल्वेच्या ७२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मध्य रेल्वेच्या ४१ आणि पश्चिम रेल्वेवरील ३१ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेल्वे प्रशासनाच्यावतीने १ जूनपासून २०० विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. त्यामुळे अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेने वर्कशॉप आणि कारशेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर हजर होण्यास निर्देश दिले आहे. मात्र आता रेल्वे कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येसुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
आतापर्यंत ७२ जणांवर कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या ४१ आणि पश्चिम रेल्वेवरील ३१ कर्मचा-यांचा समावेश आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आणखी ४९ संशयितांना उपचारासाठी दाखल केले आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.