मुंबई : मुंबईत सलग तिसऱ्या नऊ हजारांच्या घरात दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. शहर उपनगरात रविवारी ९ हजार ९८९ रुग्ण आणि ५८ मृत्यू झाले. आता मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ५ लाख २० हजार २१४ झाली असून बळींचा आकडा १२ हजार १७ वर गेला आहे. मुंबईत दिवसभरात ८ हजार ५५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख १४ हजार ६४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ९२ हजार ४६४ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५ दिवसांवर आला आहे. ४ ते १० एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.९३ टक्के आहे. दिवसभरात ५२ हजार १५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ४६ लाख १० हजार ७८९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत एकूण २ हजार ४१० आयसीयू खाटा आहेत. त्यातील केवळ ८७ खाटा रिक्त आहेत. तर ९ हजार ७६२ ऑक्सिजन खाटा असून त्यातील ८ हजार ४८१ बेड्स भरलेले आहेत. त्याशिवाय, साधे १,२८१ बेड्स रिक्त असल्याचे सांगण्यात आले. व्हेंटिलेटरवर खाटांची क्षमता १,२७३ असून त्यापैकी १,४३ खाटा भरल्या आहेत.
आठवड्याभरात मुंबईत २४१ मृत्यूमुंबईत मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्णनिदानासोबतच मृत्यूंची संख्याही हळुहळू वाढताना दिसत आहे. मुंबईत ५ एप्रिल रोजी दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला होता, आठवड्याच्या अखेरीस रविवारी ११ एप्रिल रोजी २४ तासांत मुंबईत ५८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ५ ते ११ एप्रिल दरम्यान मुंबईत एकूण २४१ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.