CoronaVirus News: धारावीनंतर आता दादरमध्ये एकही नवा रुग्ण नाही; मुंबई काेराेनामुक्तीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 01:10 AM2020-12-27T01:10:29+5:302020-12-27T07:04:42+5:30
३० एप्रिलनंतर शनिवारी पहिल्यांदाच मिळाला दिलासा
मुंबई : धारावीपाठोपाठ शनिवारी दादरमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. धारावीत दिवसभरात केवळ एक तर माहीम परिसरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे संपूर्ण जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे.
आशियातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. एप्रिल महिन्यात हॉटस्पॉट बनलेल्या धारावीने आज जागतिक स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ‘धारावी पॅटर्न’ रोल मॉडेल बनले असून, गेले तीन-चार महिने या विभागातील रुग्णांचा आकडा एक अंकी आहे. शुक्रवारी धारावीमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नव्हता. शनिवारीही यात सातत्य कायम हाेते. केवळ एक बाधित रुग्ण सापडला.
मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्यामुळे सतत वर्दळ असलेल्या दादरमध्येही आता काेराेनाचा एकही रुग्ण नाही. काही महिन्यांपूर्वी दादरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे जी उत्तर विभाग कार्यालयाने
विनामूल्य चाचणी केंद्र सुरू केली. येथील फेरीवाले, दुकानदार, पेट्रोल पंपावरील कर्मचारी या सर्वांची
चाचणी सध्या केली जात आहे. ३० एप्रिलनंतर पहिल्यांदाच दादरमध्ये एकही बाधित रुग्ण सापडलेला
नाही.