CoronaVirus News: शाळांंनंतर महाविद्यालयांचा शैक्षणिक शुल्कासाठी तगादा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 01:12 AM2020-06-19T01:12:52+5:302020-06-19T01:13:29+5:30
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तीन ते चार हफ्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मुभा द्यावी, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ यांना पत्र लिहून केली आहे.
मुंबई : एकीकडे शाळांच्या शुल्काचा प्रश्न सुटत नसताना दुसरीकडे महाविद्यालये व विशेषत: अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्काचा प्रश्न पालक, विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी बनू लागला आहे. पालकांची आर्थिक स्थिती बिघडलेली असताना अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शुल्क कसे भरायचे असा प्रश्न विद्यार्थी, पालकांपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तीन ते चार हफ्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मुभा द्यावी, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ यांना पत्र लिहून केली आहे. ठाकूर पॉलिटेक्निकच्या अनेक विद्यार्थ्यांनी युवासेनेला पत्र लिहून शुल्क भरण्यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
ठाकूर पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांच्या लेखी तक्रारीनुसार महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत ७३ हजार इतक्या शुल्काचा मागणी करण्यात आली आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी पार्ट टाइम काम करून आपल्या शिक्षणाचे शुल्क भरत आहेत. त्यातही लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे त्यातून मिळणारे उत्पन्नही नाही. अनेक विद्यार्थी गावी गेले आहेत. अशा परिस्थितीत महाविद्यालयाकडून संपूर्ण शुल्काची मागणी होत असल्याने विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत मात्र आक्रमकही झाले आहेत. ते सध्यस्थितीत शुल्क भरण्याच्या विरोधात असून सप्टेंबर- आॅक्टोबरपर्यंत महाविद्यालयाने शुल्क आकारावर अशी मागणी पालक विद्यार्थी करत आहेत.
अनेक विद्यार्थ्यांचे ईबीसीचे शुल्क अद्याप सरकारकडून येणे बाकी आहे, महाविद्यालयांना घाई असल्यास त्यामधून सध्या विद्यार्थ्यांचे शुल्क कापून घ्यावे, असेही विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारपत्रात नोंदविले आहे.
सहानुभूतीपूर्वक विचार करावा
विद्यार्थ्यांच्या या तक्रारींची दखल घेत तंत्रशिक्षण संचालनालयाला विद्यार्थ्यांचे शुल्क एकदा ना घेता ३ ते ४ हफ्त्यांमध्ये घ्यावे असे निर्देश महाविद्यालयांना देण्याची विनंती केली आहे.
शालेय शालेय शिक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांची ही वर्षे ही महत्त्वाची आहेत. सध्या सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती बिकट असताना तंत्रशिक्षण संचालनालयाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी आम्ही केल्याची प्रतिक्रिया प्रदीप सावंत यांनी दिली.