मुंबई : महानायक अमिताभ बच्चन तसेच अभिषेक बच्चन यांच्यानंतर बच्चन कुटुंबातील ऐश्वर्या राय आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना जलसामध्येच होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तर बच्चन कुटुंबातील इतरांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. बच्चन कुटुंबीयांची प्रकृती सुधारावी यासाठी अनेक बॉलीवूड कलाकारांनी सोशल मीडियावर संदेश शेअर केले आहेत.अमिताभ यांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबीयांनी खासगी लॅबमध्ये रॅपिड अँटिजेन कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाल्यामुळे, प्रोटोकॉलनुसार मुंबई महापालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये या दोघींचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. तर जया बच्चन, श्वेता नंदा, अगस्त्य नंदा आणि नव्या नवेली यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालय प्रशासनानेही त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.जलसावर अलगीकरणबच्चन कुटुंबीय, संबंधित कर्मचारी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तपशील संकलित करणे, संपर्कात असलेल्या व्यक्तींना अलगीकरणात राहण्याचे निर्देश देणे आदी सर्व कार्यवाही प्रक्रियेनुसार सुरू आहे. जलसा बंगल्यावरील कर्मचाऱ्यांची तेथेच अलगीकरण करण्याची व्यवस्था आहे. यासाठी पालिकेकडून आवश्यक ती मदत केली जाणार आहे.
बॉलीवूडला धास्तीबच्चन कुटुंबीयांच्या घरी कोरोनाची लागण झाल्याने बॉलीवूड हादरले आहे. आता कलाकारांना शूटिंगस्थळी जाऊन काम करण्याची भीती वाटू लागली आहे. मुळात गेले ३ महिने मनोरंजन विश्व पूर्णपणे ठप्प असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनलॉकच्या घोषणेनंतर योग्य ती खबरदारी घेऊन शूटिंगची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे कामाला सुरुवातही झाली. मात्र काही सेटवर कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनाही घडल्या. मात्र बच्चन यांच्या बातमीनंतर परत शूटिंग बंद होईल का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे ४,५०० कोटी रुपयांचा फटका बसलेल्या मनोरंजन विश्वाला अजून काही महिने हे नुकसान झेलावे लागणार असून अनेक येऊ घातलेल्या नवीन सिनेमांचे शूटिंग आणि प्रदर्शन लांबणीवर पडणार अशी चिन्हे आहेत.चारही बंगल्यांचे निर्जंतुकीकरणअभिनेता अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील चारही बंगले रविवारी महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. शिवाय महानगरपालिकेच्या के/पश्चिम कार्यालयाकडून रविवारी सकाळी त्यांच्या चारही बंगल्यांचे निर्जंतुकीकरण करून सर्व ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.चारही बंगल्यांवर निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमले होते. जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्सा हे बंगले कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.रणबीर कपूर, नीतू सिंग यांच्याबाबत अफवाया बातमीनंतर लगेच रणबीर कपूर, नीतू सिंग कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी पसरली. रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर हिचा पारा चढला. ही व्हायरल झालेली फेक न्यूज आहे, असे स्पष्ट करत तिने अशा बातम्या पसरवणाºयांबद्दल संताप व्यक्त केला. अशा बातम्या पसरवण्याआधी खरे-खोटे तरी तपासा. आम्ही ठणठणीत आहोत, असे रिद्धिमाने लिहिले आहे. रणबीर व नीतू सिंग यांना लागण झाल्याचे टिष्ट्वट एका युजरने केले.अनुपम खेरच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आई, भाऊ आणि वहिनी यांना कोरोनाची लागण झाल्याचे खेर यांनी टिष्ट्वट करून सांगितले. अनुपम यांच्या आई दुलारी देवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे भाऊ आणि वहिनीचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ‘मी माझी कोरोना टेस्ट केली असून अहवाल निगेटिव्ह आला आहे’, असे खेर यांनी टिष्ट्वटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट केले.