मुंबई: गणेशोत्सवानंतर मुंबईत वाढलेली रुग्ण संख्या आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील सर्वच २४ प्रशासकीय विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मंगळवारी शंभरी पार पोहोचला आहे. यापैकी सायन - वडाळा विभागात सर्वाधिक म्हणजे २९६ दिवसांनंतर रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. तसेच मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर अर्ध्या टक्क्यावर आला आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मालाड ते दहिसर या उत्तर मुंबई भागात रुग्णांची संख्या ४५ दिवसांमध्ये दुप्पट होत होती. तसेच ७० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवाशी असल्याचे आढळून येत होते. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस इतका झाला होता. मात्र संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी १४ सप्टेंबर रोजी ५४ दिवसांपर्यंत कमी झाला होता. यामुळे चिंता वाढली होती.
मात्र १५ सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत मुंबईतील घराघरात पालिकेच्या स्वयंसेवकांचे पथक पोहोचू लागले. ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले व्यक्ती या सर्वांची तपासणी करून आवश्यकतेनुसार त्यांना उपचार उपलब्ध करून देण्यात आले. या मोहिमेचा प्रभाव दिसून येऊ लागला. २१ ऑक्टोबर रोजी रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १०० दिवसांवर पोहोचला. तर मंगळवारपर्यंत मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी १३९ दिवसांवर पोहोचला आहे.
१७५ दिवसांहून अधिक दुपटीचा कालावधी असलेले विभाग....
कुलाबा - फोर्ट......१९८
वरळी - प्रभादेवी......१८६
धारावी - माहीम.....१८१
डोंगरी....१८०
हॉटस्पॉट विभागावर अखेर नियंत्रण
दहिसर.....११२
बोरिवली....१०६
कांदिवली...१०५
रुग्ण वाढीच्या दैनंदिन सरासरी दरात अशी झाली घट
२१ सप्टेंबर - १.२२ टक्के
२१ ऑक्टोबर - ०.६९ टक्के
२७ ऑक्टोबर - ०.५० टक्के