CoronaVirus News: चारपैकी एका भारतीय नागरिकात कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे, सर्वेक्षणातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:38 AM2020-08-20T04:38:34+5:302020-08-20T06:46:07+5:30
टीआयएफआर व आयआयएसईआर या दोन संस्थांनी स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे.
मुंबई : चारपैकी एका भारतीय नागरिकामध्ये कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. याविषयी राष्ट्रीय पातळीवरील खासगी संस्थेने सर्वेक्षण केले आहे. टीआयएफआर व आयआयएसईआर या दोन संस्थांनी स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे.
सेरो सर्वेक्षणात पुण्यात ५० टक्के व्यक्तींना तर मुंबईत झोपडपट्टी परिसरातील ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरात कोरोनाविरोधात प्रतिपिंडे तयार झाली आहेत. तर दिल्लीतील सुरुवातीला केलेल्या सेरो सर्वेक्षणात २३ टक्के नागरिकांमध्ये या कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे (अँटीबॉडी) दिसून आली. दिल्लीतील पुढच्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षणाचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, साथीच्या विषाणूवर औषध नसल्यास माणसाच्या शरीरात या विषाणूचा सामना करणारी प्रतिकारकशक्ती तयार होते. त्यास वैद्यकीय भाषेत रक्तातील प्रतिपिंड असे म्हटले जाते. तर, एखाद्या ठिकाणच्या ७० टक्के नागरीकांना साथीच्या आजाराची बाधा झाल्यानंतर ही प्रतिकारकशक्ती नैसर्गिकरित्या तयार होते. यालाच हर्ड इम्युनिटी असे म्हणतात.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, अजूनही देशात हर्ड इम्युनिटीचा टप्पा सुरू झालेला नाही. मात्र देशातील काही ठराविक शहरांत किंवा तेथील परिसरात हर्ड इम्युनिटी तयार होत आहे. धारावी हे त्यापैकी एक क्षेत्र असून येथे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. थायरोकेअर लॅबच्या सर्वेक्षणानुसार, देशभरातील २ लाख म्हणजेच केवळ २४ टक्के व्यक्तींच्या शरीरात प्रतिपिंडे दिसून आली.
>अतिजोखमीचे आजार असलेल्यांना धोका जास्त
राजाच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, देशात करण्यात येत असलेले सेरो सर्वेक्षणाचे चित्र सकारात्मक दिसत आहे, मात्र इतक्यात आपल्याला ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. हर्ड इम्युनिटीवर अवबंलून राहणे हा सध्या तरी पर्याय नाही. मात्र भारतीय नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्याचे निरीक्षण आहे. शिवाय, संसर्ग झालेले बरेच रुग्ण लक्षणविरहित आहेत. दक्षिणेतील राज्याच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तम आहे. यात केवळ अतिजोखमीचे आजार असलेल्यांना धोका जास्त असल्याचे दिसून येते.