CoronaVirus News : ऑक्सिजनसाठी मुंबईत सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:08 AM2021-04-16T06:08:35+5:302021-04-16T06:09:04+5:30
CoronaVirus News: मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिक ऑक्सिजनची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची मागणीही वाढली आहे. यामुळे काही ठिकाणी रुग्णांचे हाल व नातेवाइकांना दुसरे रुग्णालय शोधण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. हे अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहायक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेणार आहेत.
खासगी रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. याप्रकरणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिक ऑक्सिजनची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.