CoronaVirus News: सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:15 AM2020-05-02T06:15:45+5:302020-05-02T06:16:09+5:30
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे.
मुंबई : टाळेबंदीसंदर्भात ३ मेनंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील नागरिकांना दिलासा देण्याचे संकेत दिले. मात्र, मोकळीक दिल्यानंतरही सर्वांनी काळजी घ्यायचीच आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. रेड झोनमध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही. येथील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील, तर आॅरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
लॉकडाउनमुळे कोराना विषाणूचा गुणाकार रोखण्यात यश आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात काही भागांत कोरोना रुग्णांचे आकडे वाढलेले दिसत आहेत. परंतु पहिल्या रुग्णाशी संपर्कात आलेले, त्यांचे निकटवर्तीय यांचीदेखील तपासणी करत आहोत. त्यामुळे हे आकडे वाढल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
>शेती व शेतीसंबंधीचे व्यवहार, कृषी
माल वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यावर बंधन नाही. हळूहळू यावरची बंधने आपण उठवली आहेत, पण झुंबड झाली तर बंधने टाकावी लागतील.
- उद्धव ठाकरे