- डॉ. मिलिंद भोई
लॉकडाऊनमुळे सरकारने २ महिन्यांपासून कामगारांना एकाच ठिकाणी थांबायला लावले. कोणतेही काम नाही, उत्पन्न नाही, खायला नाही आणि घरी जाण्याची शाश्वती नाही. त्यात हे लोक घरापासून लांब आहेत. नंतर सरकारने आपल्या गावाकडे जाण्याची परवानगी दिली. मात्र, त्याची प्रक्रिया किचकट आहे. रेल्वे बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता, तर मग केंद्रानेच नियोजन करून या सर्व कामगारांना रेल्वेने त्यांच्या स्थानिक ठिकाणी जवळच्या रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते. परंतु ढिसाळ कारभारामुळे रेल्वे सोडा, पण एसटी व इतर गाड्यासुद्धा उपलब्ध करून दिल्या नाही. मिळेल ते सोबत घेऊन लाखो लोक हजारो किलोमीटर पायी, सायकलने, रिक्षाने, ट्रकने आपापल्या घरी निघाले.औरंगाबादमध्ये १६ लोकांचा रेल्वे रुळावर मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी पाच लाख असे एकूण ८० लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचे कबूल केले. याच ८० लाखांत हजारो कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवता आले असते. पण नाही... आपण आधी लोकांच्या मरण्याची वाट पाहणार आणि मगच त्यांच्या मदतीसाठी धावणार!अजूनही वेळ गेलेली नाही. गाड्यांसाठी मोठमोठ्या उद्योजकांना आणि कोट्यधीशांना तर गाड्यांमध्ये डिझेलसाठी महाराष्ट्रातील मोठमोठ्या देवस्थानांना आवाहन करा. आपल्या देवस्थानांनी आजवर आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, असे कधीही घडले नाही. उत्तर प्रदेश व बिहारमधील जे लोक महाराष्ट्रात येऊन श्रीमंत झालेत, अशा लोकांनाही आवाहन केलं तर ते नक्की त्यांच्या राज्यातील लोकांच्या मदतीसाठी पुढे येतील. फाळणीनंतर देशाने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणातकामगारांचे स्थलांतर होतानाबघितले.केंद्र सरकार तसेच सर्व राज्य सरकारांनी मतभेद मिटवून एकत्र येणे गरजेचे आहे. लोकांना सध्या वेळेवर पुरेसे धान्य मिळत नाही. विषाणूच्या संसर्गापेक्षा लोक उपासमारीने, उष्माघाताने, अपघाताने जास्त मरत आहेत. निवडणुकांच्या वेळी उमेदवारांचे फोटो व पक्षाचे चिन्ह असलेल्या मतदानाच्या पावत्या प्रत्येकाच्या घरी पोहोचतात. मग मास्क आणि ३ महिन्यांचे धान्य कसे पोहोचू शकत नाही?मूठभर श्रीमंत लोकांना वाचविण्यासाठी करोडो गरीब लोकांच्या जिवाशी खेळण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. श्रमजीवी लोकांशिवाय देश उभा राहूच शकणार नाही, याची जाणीव ठेवून सर्व मतभेद मिटवून एकत्रयावे. ‘कोविड-१९’विरुद्धचे हे युद्ध एकोप्याने लढलो तरच आपण जिंकू, हे ध्यानात ठेवावे.(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.)